आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणण्याची पध्दत आहे.
प्रस्तावना
प्रस्तुत मंत्रपुष्पांजली ही वेदोक्त (वेदांमधील) आहे. वेदोक्त मंत्रांना स्वर असतात. त्यामुळे हे मंत्र या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीकडून नीट शिकून, त्याचा चांगला सराव करून मगच म्हणावेत. वेदोक्त मंत्र चुकीचे म्हटले गेल्यास त्याचा म्हणणार्या’ला त्रास होऊ शकतो.
मंत्रपुष्पांजली
ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या:संति देवा: ।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान् कामकामाय मह्यंकामेश्वरो वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम: ।
ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्याईस्यात् सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात् ।
पृथिव्यैसमुद्रपर्यंताया एकराळिती ।
तदप्येषश्लोकोऽभिगीतो “मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्याऽवसन् गृहे ।
आविक्षितस्यकामप्रेर्विश्वेदेवा: सभासद” इति ।
अर्थ
देवांनी यज्ञ करून यज्ञपुरुषाची, यज्ञस्वरूपी परमेश्वराची पूजा केली. यज्ञाने पूजन करणे हा त्या काळी (त्रेतायुगात) प्रमुख धर्म, साधनामार्ग होता. जेथे पुरातन, अनादि असे उपास्यदेव आहेत असे देवलोक, साधना करणारे थोर महात्मे खरोखर प्राप्त करून घेतात. (यज्ञातील हविर्द्रव्ये ज्या देवतांप्रीत्यर्थ यज्ञ केला जात असे, त्या देवतांना पोहोचून त्या तृप्त होत असत व यज्ञ करणार्यांना इष्टफलाची प्राप्ती होत असे.)
राजाधिराज, सर्वशक्तिमान् अशा वैश्रवण (ज्ञानी, ज्याने ज्ञान उत्तम प्रकारे श्रवण केले आहे अशा) कुबेराला आम्ही नमन करतो. तो सर्व कामना पूर्ण करणारा वैश्रवण कुबेर (ज्ञानी व सर्व संपत्तीचा स्वामी कुबेर), कामनांनी युक्त असलेल्या माझ्या सर्व कामना पूर्ण करो. महाराज वैश्रवण कुबेराला नमस्कार असो. आमचे कल्याण असो. आमची ऐहिक व पारमार्थिक उन्नती होवो. (कुबेराला वैश्रवण असेही नाव आहे. हा ब्रह्मदेवांचा पुत्र पुलस्त्य याचा मुलगा. त्याला ब्रह्मदेवानी अमरत्व दिले, तसेच धनाचा अधिपती व लोकपाल केले. त्याला शंकराशी सख्यत्व व यक्षांचे आधिपत्य आणि राजाधिराजपद दिले.)
सर्वसामर्थ्यवान्, चक्रवर्ती राजा असलेले आमचे हे राज्य एकछत्री, सर्व ऐश्वर्याने युक्त, मोक्षप्रद, साधनेला पोषक, सिद्धीप्राप्त, सर्वश्रेष्ठ, सर्व विश्वाचे अधिपतीत्व असलेले महान, विशाल राज्य, विश्वाच्या अन्तापर्यंत, परार्ध (ब्रह्मदेवाची राहिलेली ५० वर्षे) संपेपर्यंत चिरकाल नांदो. आमचा राजा समुद्रवलयांकित पृथ्वीचा सम्राट असो.
त्यानंतर या श्लोकाने आविक्षित मरुत्त या राजाचे स्मरण केले आहे. या राजाविषयी असे म्हटले आहे की, आविक्षित या थोर राजाच्या मुलाला त्याच्या जातकर्माच्या वेळी तुंबरूंनी आशीर्वाद दिला होता की, ‘तो चक्रवर्ती राजा होईल. इंद्र व लोकपाल त्याचे कल्याण करतील.
दक्षिण, पश्चिम व उत्तर या दिशांकडील मरुत् त्याला अनुक्रमे स्वास्थ्य, पराक्रम व बल देतील.’ पुरोहिताने ‘मरुत् तव’ असा उल्लेख केल्याने व आविक्षिताचा मुलगा म्हणून तो आविक्षित मरुत्त या नावाने प्रसिद्ध झाला. हा इंद्राच्या बरोबरीचा व अतिशय वीर्यवान होता. समुद्रवलयांकित पृथ्वी त्याच्यावर अनुरक्त होती. महाराज आविक्षित मरुत्ताने काम, क्रोध व लोभ जिंकून धर्माने सार्या पृथ्वीचे पालन केले. याच्यासारखा राजा झाला नाही व पुढे होणार नाही.